एसटीने केलेला नागपूर पर्यंतचा पहिला प्रवास
प्रवासाची तारीख :- ४/५ डिसेंबर २०२२
तुम्हाला तर माहीत आहेच मला एसटी प्रवास किती आवडतो , पण यावेळेस केलेला प्रवास हा वेगळा होता कारण एसटीने मी पहिल्यांदा नागपूरला एकट्याने प्रवास केला.
तर प्रवासाची सुरुवात झाली ती औसा ( जि.लातूर )पासून. प्रवासाला तर निघालो, पण एकटा असल्यामुळे मनात धाकधूक होतीच, आपण कसे पोहचू? पण बसच ऑनलाइन रिजर्वेशन केल्यामुळे तेवढी चिंता नव्हती . औसा वरून मला कर्नाटक राज्य परिवहन ची अथणी - परळी वैजनाथ ही बस मिळाली ती थेट लातूर बसस्थानक क्रमांक २ ला जाणार होती आणि मला पण तिथेच जायचे होते .
लातूर बसस्थानकावर गेल्यावर सर्वात आधी माझी जुनी आवड पूर्ण केली ( एसटी बसेसचे फोटोस काढले 😅).
बरोबर ६:१५ ला परळी आगाराची लातूर नागपूर बस फलाटावर लागली. गाडीला प्रचंड गर्दी होती, बर झालं मी आधीच बसच रिजर्वेशन केलेलं होत. ठीक सायंकाळी ६:३० वाजता बस लातूर बसस्थानकातून निघाली व प्रवासाला सुरुवात झाली. रात्रभर प्रवास करायचा होता बस तशी जेवणासाठी थांबणार होतीच पण तरी सोबत एक बिस्कीटचा पॅकेट ठेवला. एकटा असल्याने प्रवासात बोलण्यासाठी कोणीच नव्हते म्हणून बाजूला बसलेल्या प्रवाश्यासोबत गप्पा करण्यास सुरुवात केली आणि गप्पा गोष्टी करत प्रवासाला सुरुवात झाली.
या बसचं वैशिष्ट्य हे की ही बस परळी आगाराची आहे आणि परळी वरून लातूरला येते आणि लातूरवरून ही बस नागपूरसाठी रवाना होते
गप्पा गोष्टी करता करता कधी अंबाजोगाई आलं समजलं नाही , रोड एकदम मस्तच, आणि अंबाजोगाईचे बसस्थानक पण एकदम नवीन बनवण्यात आलेले. अंबाजोगाई वरून बस ७:५० ला निघाली. समोरचा स्टॉप होता परळी वैजनाथ, परळी बसस्थानक येण्याच्या अगोदरच एका पेट्रोल पंपवर बस डिझेल भरण्यासाठी थांबली व मग त्यानंतर बस परळी वैजनाथ बसस्थानकात ८:३० वाजता गेली. ( परळीला या बसचे चालक वाहक बदली होतात ). पण गाडीतील माझ्या मागच्या सिटची खिडकी तुटल्यामुळे गाडी परळी आगारामध्ये नेण्यात आली व तिथे आमचा 15 मि. वाया गेले. ८:५० ला बस फलाटावर लागली व बसचे चालक वाहक बदली झाले आणि बस ९:०० वाजता परळीमधून मार्गस्थ झाली.
परळीनंतर गंगाखेड व मग आम्ही परभणीला पोहचलो, परभणी पोहचल्या बरोबर सगळ्यात पहिले मनात विचार आला तो हा (जगात जर्मनी आणि भारतात परभणी)😁. सोबत जे प्रवासी होते त्यांचा निरोप घेतला व बस ही ठीक १०:५० ला परभणी येथून निघाली.
रात्रीचे ११ वाजले होते भूक तर प्रचंड लागलेली होती बस औंढा नागनाथला थांबणार हे मला आधीच माहीती होते. बस ठीक १२:०० वाजता हॉटेल नॅशनल ला थांबली. जेवण झाल्यानंतर बस पुन्हा मार्गस्थ झाली. बस हिंगोली येथे पोहोचली.
पुसदला बस ठीक रात्रीच्या २:४५ वाजता पोहचली. तिथे बसचे चालक वाहक बदली झाले. पुसदवरून बस ३:०० वाजता निघाली आणि चहासाठी ४:१५ वाजता बोरी अरब ( यवतमाळ जिल्हा ) येथे थांबली. बोरी अरबचा चहा आणि खिचडी प्रसिद्ध आहे, येथून जाणाऱ्या प्रत्येक बसेस या हॉटेलला चहासाठी थांबतात. चहा आणि एसटीचा प्रवास एक वेगळाच अनुभव असतो. चहाचा ब्रेक झाल्यानंतर बस यवतमाळच्या दिशेने निघाली व यवतमाळला ठीक सकाळी ५:०० वाजता पोहचली.
बस बरोबर सकाळी ८:१५ वाजता नागपूर गणेशपेठ बसस्थानकावर पोहचली!
अशाप्रकारे लातूर ते नागपूर १४ तासाचा प्रवास पूर्ण झाला , मी एकट्याने केलेला हा नागपूर पर्यंतचा पहिला प्रवास ! ❤️

Comments