लोकं म्हणतात..!
का इतका एसटीने प्रवास करतो..?
एसटीला एवढ्या भेटवस्तू का देतो..?
का या एसटीसाठी इतका लगाव...?
त्यांच्या सर्व प्रश्नासाठी माझे एकच उत्तर असते की, एसटीचा प्रत्येक प्रवास हा माझ्या आयुष्यातला साक्षात्कारी क्षण असतो आणि चार चाकीच्या तो बंद गाडीत, कृत्रिम हवा घेत मला अजिबात मिळत नाही.
चिखल उडलेल्या दरवाज्याचा, मळलेल्या खिडकीचा, गंज चढलेल्या आसनाचा रंग जेव्हा आपल्या कापडाला लागून शरीरात भिनतो, तेव्हा एसटीने स्वतःच्या अंगावर या समाजाप्रती झेललेली कित्येक चिखल मातीचे निशाण आपणास आपोआप दिसू लागतात, उमजू लागतात.
.
खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या सरीचा गोडवा हा फक्त एसटीच्याच प्रवासात मिळू शकतो.
दऱ्या खोऱ्यातील आड-रानात, नागमोडी घाटातील अवघड वळणावर खिडकीत बसून बाहेर डोकावले तरी काळजात धस्स होते आणि आपण एसटीरुपी मायेच्या कुशीत किती सुखरूप आहोत याची प्रचिती येते..
.
एसटीच्या या उबदार कुशीत तिने माझ्यासारख्या अनेक वाटसरूंना अगदी अलगदच झेलले आहे आणि प्रवासाचा हाच मार्ग कायमस्वरूपी सुखरूप आणि सुरक्षित करून ठेवला आहे.
एसटीची महती अपरंपार आहे...🙏
तिच्या टपावर उभे राहून चहुबाजुला आणि खाली नजर टाकली की, एसटीनामक विश्वाच्या गराड्यात आपण किती क्षुद्र आहोत याची प्रचिती येते आणि अंगात शिरलेला सगळा अहंकार हा आपोआप गळून पडतो.
" मी केलेले एसटीचे निरीक्षण "
आज पर्यंत लहानपणा पासून माझा जो काही प्रवास झाला त्यापैकी ९५% प्रवास हा एसटीने झालाय ,त्यामुळे अनेक एसट्या बघितल्या आहेत,आणि इतका अनुभव पाठीशी असल्यामुळे मी हळूहळू एसटीचे निरीक्षण करू लागलो. (मी काही तज्ञ नाही तरी थोडा अनुभव पाठीशी आहे) माझ्या निरीक्षणामध्ये अनेक एसट्या आल्या. एसटी मध्ये पण अनेक प्रकार असतात ,म्हणजे मॉडेल मध्ये प्रकार तर असतातच ; पण जर ह्या एसट्याना डोळे,कान,चेहरा असतो असे गृहीत धरलं आणि एसटीला माणसाप्रमाणे रूप दिले तर खरच किती मजा येईल.
अर्थात मी जे एसटीचे निरीक्षण केले ते जरी पुर्णपणे काल्पनिक असले तरी पण मी त्या निरीक्षणाच्या वेगवेगळ्या category केल्या आहेत. अशोक लेलँड,टाटा,आयशर अशा नामांकित कंपन्यांच्या बसेस सेवेत आहेत. आधी एसटीच्या सेवेत जुनी एसटी होती ,ती कालांतराने कालबाह्य झाली. नंतर मग टाटा कंपनीची वर काच असलेली व मागे दरवाजा असलेली एसटी सेवेत होती. नंतर वरती बोर्ड असलेली एसटी गेली आणि ड्राइव्हरच्या वरच्या बाजूला बोर्ड असलेली एसटी होती यातही एसटीला मागे दार होते. ती पण नंतर कालबाह्य झाली. त्यानंतर पुढे दार असलेली एसटी सेवेत आली. त्यानंतर हळूहळू एसटीचा विकास होत गेला,आणि मग २×२ परिवर्तन बसेस आल्या. ह्या लालपऱ्या म्हणून खूप प्रसिद्ध झाल्या. नंतर मग अनेक प्रकार आले. एशियाड(आत्ताची हिरकणी) आली,मिडी बस आली, शहरी सेवेसाठी असणाऱ्या एसटी बस आल्या. ह्या सगळ्यांची मौज खूप निराळीच होती. २×२ हिरकणी ह्या दादर-पुणे मार्गावर अविरतपणे सेवा बजावत आहेत .(अन्य मार्गांवर ही आहेत ,फक्त दादर-पुणे मार्गावर जास्त बसेस आहेत . कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही.) त्यानंतर शिवनेरी आल्या,मग अश्वमेध बस आल्या ह्या ही बस दादर-पुणे मार्गावर उत्तम प्रतिसादाने चालू आहेत. हल्ली खाजगी वाहतुकीला चाप बसवण्यासाठी एसटीने शिवनेरी व अश्वमेध ह्या सेवेत आणल्या.आणि आता ह्या बस वोल्वो कंपनीच्या आहेत. हिरकाणीच्याच तिकिटांच्या किमतीत आता शिवशाही बस आल्या. नवे पर्व शिवशाही सर्व या टॅग लाइन अंतर्गत शिवशाही सेवा सुरू झाल्या. लोकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे ह्या सेवांना.
▪️एसटीचे मी बघितलेले विविध रंग:- यामध्ये लाल परिवर्तन ,आधीची जुनी एसटीचा बिस्कीट कलर व थोडा केशरी रंग होता. मिडी बस चा पोपटी ,हिरकणीचा हिरवा व आता जांभळा , शिवनेरीचा आकाशी निळा, अश्वमेध चा चॉकलेटी आणि आता शिवशाहीचा पांढरा असे अनेक रंग होते .(अन्य ही रंग आहेत निळा इ. पण प्रमुख रंग हे होते म्हणून हे लिहिले आहेत.)
▪️ सध्या एसटीने घेतलेली इलेक्ट्रिक बस जोमात सुरू आहे. जसे एसटीची पहिली बस अहमदनगर ते पुणे धावली होती,त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बस सुद्धा अहमदनगर-पुणे-अहमदनगर या मार्गावर धावली. या इलेक्ट्रिक बसचे उदघाटन एसटीचे पहिले वाहक मा.श्री. लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते झाले होते.
नुकत्याच महामंडळात भरती झालेल्या मिनी-इलेक्ट्रिक बस बोरिवली-नाशिक व ठाणे-बोरिवली या मार्गावर सेवा देत आहेत.
▪️माझ्या नजरेतील एसटी त्या अशा की टाटाच्या एसट्या ह्या मला थोड्या रागीट स्वरूपाच्या वाटतात. ह्या एसट्या प्रामुख्याने घाटावर आहेत. त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे अशोक लेलँड च्या धाटणीच्या गाड्या ह्या अतिशय गरीब ,शांत ,सोज्वळ दिसतात .ह्या दोन्ही कंपन्यांच्या एसट्या सेवेत आहेत पण माझी लाडकी म्हणजे अशोक लेलँड. अशोक लेल्यांडच्या बस ह्या प्रामुख्याने कोकण,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सेवेत आहेत. टाटाच्या बस ह्या पळायला उत्तम, तर अशोक लेलँडच्या बस ह्या सस्पेंशन ला उत्तम. दोन्ही अगदी तोडीसतोड.. असो एसटी बद्दल बोलायला लागलो तर शब्द आणि वेळ कमी पडेल म्हणूनच इथेच लेखणी थांबवतो.
▪️धन्यवाद▪️
-------------------------------------------
आपल्या महाराष्ट्राच्या लालपरीचे फोटो/विडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून फॉलो करा:- आमचा युट्युब चॅनलसुद्धा आहे, एसटीचे गेमिंग व्हिडीओज पाहण्यासाठी सब्सक्राईब करा:- https://yt.openinapp.co/cdibq
-------------------------------------------------------
आम्ही एसटीचे आकर्षक मार्गफलक सुद्धा बनवतो अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा- ९६०७६१७८८९











Comments