वाडा नगरपंचायत – माझ्या एका वर्षाच्या प्रवासाचा अनुभव

 समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळावी आणि त्यातून नवीन शिकायला मिळावं, हेच माझ्या वाडा नगरपंचायतमधील प्रवासाचं सार आहे. या एका वर्षात केवळ नोकरी नव्हे, तर अनेक आठवणी, अनुभव, आणि माणसं जोडली गेली.

वाडा नगरपंचायत, वाडा (जि.पालघर)

वाडा नगरपंचायत
मध्ये कामाला लागल्यानंतर पहिल्यांदा ऑफिसमधील वातावरण समजून घ्यावं लागलं. साल २२-०८-२०२३(माझ्या वाढदिवशी) मध्ये मला वाडा नगरपंचायतचे माजी कर अधिक्षक विवेक घायवट सर यांनी कामावर घेतले, पण काही दिवसांनी त्यांची बदली शहापूर नगरपंचायत येथे झाली, त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही.सुरुवातीला घरपट्टी/पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटीस बनविणे ते आतापर्यंत चा प्रवास खूप मजेशीर गेला. आताचे कर निर्धारण तथा प्रशासकीय अधिकारी श्रीम. पायल मॅडम आणि मुख्याधिकारी श्री. मनोज सर, शहर समनवयक श्री. विकास दडस सर यांनी मला कामामध्ये नेहमीच मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज कार्यालयीन कामकाजातील बारकावे शिकता आले. तसेच, ऑफिसमधील शिपाई आणि इतर कर्मचाऱ्यांनीही वेळोवेळी मदत केली. ऑफिसमध्ये काम करताना केवळ कर्मचारीच नव्हे, तर एक कुटुंबासारखे नातं तयार झालं.


नगरपंचायतीसारख्या ठिकाणी काम करताना विविध प्रकारची कामे हाताळावी लागली. कधी आवक-जावक विभागात दस्तऐवजांची नोंद ठेवण्याचं काम असो, तर कधी कोणती नवीन योजना आली की नागरिकांचे फॉर्म भरून देण्याची जबाबदारी घेतली. वाडा नगरपंचायतच्या महसुली उत्पन्नात घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा मोठा वाटा आहे. नागरिकांकडून हे कर वेळेवर जमा होतील याची जबाबदारीदेखील काही वेळा माझ्यावर आली. यामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवणं, थकबाकीदारांना नोटिसा देणं आणि त्यांच्या शंका दूर करणं यासारखी कामं समाविष्ट आहेत.

नगरसेवकांशी ओळख होणं आणि त्यांचे काम करणं हे एक वेगळंच अनुभवविश्व होतं. प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील नागरिकांच्या अडचणी घेऊन येत असत, आणि त्यांना प्रशासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावं लागलं. यातून स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया कशी चालते, हेही जवळून पाहता आलं.


शासनाच्या अनेक योजना येत असतात, ज्या थेट नागरिकांना लाभ देतात. कधी दिव्यांग योजना, कधी प्रधानमंत्री स्वनिधी योजना, तर कधी नवीन उपक्रम. या सर्वांसाठी नागरिकांना फॉर्म भरून देणं, त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रं गोळा करणं आणि त्यांचं काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी घेणं या गोष्टी केल्या.

काम करत असताना वाड्यातील अनेक नागरिकांशी ओळख झाली. त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना योग्य माहिती देणं, आणि शक्य असल्यास त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणं, हे करताना समाजसेवेचं समाधान मिळालं.

विशेषतः "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" या योजनेसाठी नागरिकांचे फॉर्म भरताना एक वेगळाच अनुभव मिळाला. सायली मॅडम, सचिन रसाळकर सर, स्नेहा पाटील, भाग्यश्री ताई,नम्रता गायकवाड यांच्यासोबत मी खूप फॉर्म भरले. काहींना योजना समजावताना आनंद झाला, तर काहींना त्यांच्या अडचणींमधून मार्ग काढताना समाधान मिळालं. कधी कॉम्प्युटरमध्ये फॉर्म भरता आला नाही तर, मोबाईलचा वापर करून त्यांचे फॉर्म भरले. त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी तयार करून दिली आणि अनेक महिलांना योजनेची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांचे अनुभव ऐकता आले आणि काही प्रमाणात त्यांचे प्रश्न सोडवण्यात मदत करता आली. आता बॅनर डिझाईन तसेच कोणताही event, सार्वजनिक कार्यक्रम असो मला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा चांगला काम मिळाला आहे, तसेच कार्यालयाचे सोशल मीडिया हँडलचं management ही पाहतो.


हा काळ केवळ नोकरी करणं यापुरतं मर्यादित नव्हता, तर त्यातून माणसं जोडणं, प्रशासनाच्या कामकाजाची समज वाढवणं, आणि समाजासाठी काहीतरी करणं या गोष्टींनी ते अविस्मरणीय बनवला. एकूणच वाडा नगरपंचायतीच्या कामाचा एक भाग होणं, हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे. भविष्यात या अनुभवांचा वापर करून आणखी चांगलं काम करता येईल, आणि समाजासाठी आणखी अधिक योगदान देता येईल, याचा प्रयत्न करेन. वाडा नगरपंचायतमधील हा काळ माझ्यासाठी कायम लक्षात राहील!

Comments