मी केवळ एक बस नाही, मी प्रवाशांच्या आठवणींचा एक भाग आहे. कोणाला आपल्या गावी जायचं असतं, कोणाचा नवा प्रवास सुरू असतो

 

मी पुसद आगारची एमएच.४०.एक्यु.६२६४ राहणार पुसद आगार, यवतमाळ विभाग.माझा जन्म नागपूर येथील हिंगणा कार्यशाळेत झाला. तेथून आजपर्यंत मी प्रवाशांची सेवा करताना थकली नाही.

मुंबई वरून दुपारी ३:३० वाजता माझा माहेरी जाण्याचा प्रवास सुरु होतो. रात्र झाली की मी जागी होते.दुसऱ्या बसेसच्या दिवसभराच्या धावपळीनंतर प्रवाशांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्यासाठी मी नेहमी सज्ज होते. माझ्या सोबत रोजच्या प्रवासात किमान ४०% रिझर्वेशनचे प्रवासी असतात, जे मला कधी न कधी भेटत असतात. ठाणे, भिवंडी, नाशिक, छ. संभाजीनगर (*औरंगाबाद) जालना,मंठा, जिंतूर, हिंगोली, कळमनुरी ओलांडत मी पुसदच्या दिशेने झेपावते. माझा हा प्रवास माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे.

माझी जबाबदारी एसटीचे तीन आगार सांभाळतात – नाशिक, जालना आणि पुसद. पण माझं खरं माहेरघर म्हणजे पुसद आगार (यवतमाळ विभाग). इथल्या स्टाफकडून मला नेहमीच योग्य देखभाल मिळते. माझ्या इंजिनचं ऑइल तपासलं जातं, ब्रेक्स व्यवस्थित आहेत का ते पाहिलं जातं. डेपोत मला स्वच्छ करण्यासाठी वॉशिंगला नेतात. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास मिळतो. माझ्या चाकांवर मी हजारो किलोमीटर फिरत राहते, पण माझ्या स्टाफचे प्रेमळ हात मला कायम टवटवीत ठेवतात.

माझ्या नियोजित मार्गाव्यतिरिक्त कधी कधी मला नागपूरपर्यंत जावं लागतं. तिथून परत येऊन लगेच मुंबईसाठी तयारी करावी लागते. हे थकवणारं असतं, पण प्रवाशांच्या सेवेसाठी मी कधीच थकत नाही. दिवस असो, रात्र असो, मी रस्त्यावर धावत असते, कुठे तरी एखाद्या प्रवाशाच्या वाटेची सोबत करत.

माझ्या प्रवासात ऋतू बदलत राहतात. उन्हाळ्यात मी गरम वाऱ्यांमध्येही माझ्या प्रवाशांना त्यांच्या मुक्कामापर्यंत सुखरूप पोहोचवते. पावसाळ्यात रस्ते ओलेसर होतात, तरीही मी माझ्या ब्रेक्सवर नियंत्रण ठेवत सुरळीत धावते. थंडीच्या रात्री जरी माझ्या काचांना धुक्याची चादर पडलेली असली, तरीही मी माझ्या मार्गावर अढळ असते.

मी नाशिक, औरंगाबाद, जालना, मंठा, जिंतूर, हिंगोली, कळमनुरी ओलांडत पुसदला दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता माझ्या शेवटच्या थांब्यावर पोहोचते. प्रवाशांना त्यांचे गाव दिसायला लागलं की त्यांचे चेहरे आनंदाने उजळतात. त्या आनंदासाठीच मी रात्रभर धावत असते.

पुसद आगारात पोहोचल्यावर मी थांबत नाही. ग्रामस्थांसाठी माझी पुढची फेरी सुरू होते. गावोगावी जाऊन प्रवाशांना घेऊन पुन्हा मी डेपोत परतते. मग पुन्हा मी वॉशिंगला जाते, माझं इंजिन तपासलं जातं, आणि मी पुन्हा एकदा मुंबईच्या प्रवासासाठी सज्ज होते.

मी केवळ एक बस नाही, मी प्रवाशांच्या आठवणींचा एक भाग आहे. कोणाला आपल्या गावी जायचं असतं, कोणाचा नवा प्रवास सुरू असतो, कोणाला कामानिमित्त शहरात जायचं असतं – या प्रत्येक प्रवासात मी त्यांची सोबती आहे. मी रात्रभर धावते, थांबत नाही, थकत नाही, कारण माझं ध्येय एकच – प्रवाशांना त्यांच्या मुक्कामापर्यंत सुरक्षित आणि सुखरूप पोहोचवणं.

माझ्या पुढच्या प्रवासासाठी मी सज्ज आहे…

रात्र झाली की माझं इंजिन पुन्हा सुरू होतं, माझ्या आत पुन्हा प्रवासी बसतात, आणि मी पुन्हा मुंबईच्या दिशेने दुपारी ३:१५ वाजता निघते. कारण मीच ती – मुंबई-पुसद मार्गावरची तुमची रातराणी लालपरी !

Comments