एसटी सेवा ही जरी ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एक मोठा आधार आहे


बसस्थानकावर उभे राहून आपल्या इच्छित बसची वाट पाहण्याचा अनुभव प्रत्येक प्रवाशाने घेतलाच असतो. पण कधी कधी ही वाट पाहण्याची वेळ जरा जास्तच वाढते. मग काय? कंटाळलेले प्रवासी, गरम ऊन, मनात वाढत जाणारी चिडचिड आणि वेळेवर न आलेली बस—हे सारेच वातावरण थोडे विचित्र आणि कधी कधी असह्य वाटते. या ब्लॉगमध्ये अशाच एका अनुभवाचा मागोवा घेऊया, जिथे बस उशिरा येणे हे फक्त एक वाहतूक समस्या नसून प्रवाशांच्या मानसिकतेवर परिणाम करणारा एक घटक आहे.

वाडा आगारच्या बसस्थानकावर एका महत्वाच्या प्रवासासाठी पोहोचलो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्य आपल्या प्रखरतेचा कळस गाठत होता. अनेक प्रवासी त्यांच्या-त्यांच्या गाड्यांच्या प्रतीक्षेत होते. कोणीतरी वाड्याहून पालघरला जायचं म्हणत होतं, तर कोणाला बॉईसरला. पण सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता – "माझी बस कधी येणार?"

मी काही प्रवाशांशी संवाद साधला. संतोष पाटील, जो रोज सकाळी मनोरला कामानिमित्त जातो, तो म्हणाला,

"भावा, रोज निघण्याचा माझा हा ठरलेला वेळ आहे. पण बस उशिरा आली की ऑफिसला पोहोचायला उशीर होतो. साहेबांना रोज कारण सांगायचंही कठीण झालंय!"

त्याच्याच बाजूला बसलेल्या एका मुलीने (नेहाताई) सांगितलं,

"मी मैत्रिणच्या घरी चालले, दोन तास झाले, पण जी बस हवी ती आली नाही. खूप त्रास होतो हो, एवढ्या उन्हात उभं राहणंही अवघड जातं."

आणि अशा कितीतरी प्रवाशांच्या तक्रारी ऐकून माझंही मन अस्वस्थ झालं.


प्रतीक्षा तर करायचीच होती, पण उन्हाचा त्रास देखील कमी नव्हता. अनेक प्रवासी आपली पाण्याची बाटली सोबत ठेवून ऊन टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक बसस्थानकाच्या छपराखाली सावलीत उभे होते, तर काहींनी चक्क ओल्या टॉवेलने डोकं झाकलं होतं.

एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीं आपापसात बोलत होते,

"आपल्या तर परीक्षा आहेत, आणि बस उशिरा आली की वेळेवर पोहोचताच येत नाही. इथे उन्हात उभं राहणं म्हणजे दुसऱ्या परीक्षेला बसल्यासारखं वाटतं !"

काही जण नाराज होते, काही जण या परिस्थितीला सरावले होते, आणि काहींना हसू फुटलं होतं.


प्रत्येक प्रवाशाला त्याच्या ठिकाणी पोहोचायचं असतं, पण नेमकी तीच बस उशिरा येते किंवा दिसतच नाही ! एक वयोवृद्ध काका म्हणाले,

"पाच बस आल्या, पण कोणतीच पालघर किंवा बोईसरला जाणारी नव्हती ! काय नशीब आहे आमचं?"

हा प्रश्न अनेकांना पडतो – ज्या गाड्या आपल्याला नको असतात त्या वेळेवर कशा येतात, आणि जी बस हवी तीच उशिरा कशी येते?


शेवटी डेपोतून एक लाल रंगाची एसटी धूळ उडवत येताना दिसली. सर्व प्रवासी उत्सुकतेने तिच्याकडे पाहू लागले. पण जसजशी बस जवळ येत गेली, तसतसं काहींच्या चेहऱ्यावर आनंद, तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा उमटली.

"ही तर जव्हारची आहे, आपली नाही!"

पुन्हा एकदा वाट पाहणं आलंच.


पुन्हा डेपोतून अजून एक लाल रंगाची धूळ भरून निघालेली एसटी आली. हळूहळू ती जवळ येत होती आणि परत प्रवाशांच्या नजरा ती बस ओळखण्याचा प्रयत्न करत होत्या. जसजशी ती जवळ आली, तसतशी काहींच्या चेहऱ्यावर समाधान उमटले.

"अरे, हीच आहे आपली बस!"

अचानक प्रवाशांमध्ये चैतन्य संचारलं. ज्या प्रवाशांनी २-३ तास वाट पाहिली होती, त्यांना एक मोकळा श्वास मिळाला. हातातल्या बॅगा उचलून लोक चटकन लाइनमध्ये उभे राहू लागले. कोणी पाण्याची बाटली भरून घेत होती, तर कोणी प्रवासात लागणारे पैसे व्यवस्थित ठेवत होतं.

एसटी बसस्थानकात शिरताच प्रवाशांची लगबग वाढली. काहींनी बसच्या दरवाज्यात पाय ठेवताच म्हणलं,

"शेवटी बस आली ! आता तरी पोहोचू वेळेत."

ड्रायव्हर आणि कंडक्टरही जरा दमलेले वाटले. ते प्रवाशांना बसमध्ये बसवण्यात आणि तिकीट देण्यात गढून गेले. शेवटी, बस हलू लागली, आणि सगळ्यांनी मोठा श्वास घेतला.


बसस्थानकावर प्रतीक्षा करताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात:

धीर आणि संयम महत्त्वाचा! – कारण काहीही करून बस लवकर येणार नाही.

उशीर झाल्यास दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार ठेवा.

पाण्याची बाटली आणि टोपी अनिवार्य! – उन्हापासून वाचण्यासाठी.

सकारात्मक विचार करा! – रागावून काही फायदा नाही, त्यापेक्षा परिस्थितीचा विनोद करायला शिकावं.


निष्कर्ष-

बसस्थानकावर उशिराने आलेली बस ही एक समस्या आहे, पण प्रवाशांचे अनुभव आणि भावना समजून घेतल्यावर लक्षात येतं की, हे फक्त वाहतुकीचे नियोजन नाही, तर रोजच्या जीवनाचा एक भाग आहे. एसटी सेवा ही जरी ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एक मोठा आधार आहे, तरी तिचे वेळापत्रक आणि नियोजन सुधारायला हवे.


पुढच्या वेळी तुम्हीही उशिराने आलेल्या बसची वाट पाहत असाल, तर आठवा – तुम्ही एकटे नाही, हजारो प्रवासी तुमच्या सोबतच आहेत, कंटाळा घेत!

Comments