चार तास फक्त एक बसची वाट पाहिलेला काळ नव्हता—हा एक अनुभव होता
रात्रीचे १:३० वाजता मुंबई-शहादा बसने नाशिकच्या मेळा बसस्थानकात उतरलो. मला छ. संभाजीनगरला जायचे होते, बस फलाटावर लागली नव्हती, वेळ घालवण्यासाठी बसस्थानकाचा परिसर फिरण्याचा विचार केला. फिरता फिरता अचानक अंधारात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसकडे लक्ष गेले. बघतो तर ती एसटीची स्वमालकीची अशोक लेल्यांड बीएस-६ बस होती. ती बस वाशिम आगार, अकोला विभागची होती. आणि मला जायचं होतं संभाजीनगर (औरंगाबाद) ला. त्याच वेळी बसस्थानकात आवाज गुंजायला लागला―निफाड, येवला, वैजापूर, गंगापूर मार्गे छ. संभाजीनगर...! त्याच वेळी मी माझे मन बदलले, “थोडा वेळ वाट बघू आणि त्या नवीन बसनेच प्रवास करू,असा विचार केला.” बसची वाट पाहायची होती. ही बस माझ्या गावातून नव्हती, पण तिचा प्रवास नव्या मार्गावर पहिल्यांदाच सुरू होणार होता. आता फक्त एकच विचार होता–ती फलाटावर कधी लागणार, तिची फलटावरची एन्ट्री कशी असेल, चालक-वाहक कसे असतील—हे सारे विचार मनात घोळत होते. या वाट पाहणाऱ्या ४ तासांत अनेक बसेस माझ्यासमोरून गेल्या, काही थांबल्या, काहींनी हॉर्न वाजवला आणि काहींनी वेग घेतला. पण माझ्या डोळ्यांना शोध होती याच नवीन बसची!
बसस्थानकाच्या एका कोपऱ्यात चहाची टपरी होती. गार वाऱ्याने शरीर थंडावलेले, हात खिशात ठेवून उभा असताना चहाचा वाफाळता कप घेतला आणि एकच घोट घेतला—तो उबदारपणा जीवाला समाधान देऊन गेला. रात्री उशिरा प्रवास करणारे प्रवासी, चालक-वाहक, काही स्थानिक रिक्षावाले तिथे चहा घेत गप्पा मारत होते. कोणी बस अजून का नाही आली यावर चर्चा करत होतं, तर कोणी आपल्या प्रवासाच्या गमतीजमती सांगत होतं. हे सारे ऐकत, गरम चहा पित मी माझ्या बसच्या प्रतीक्षेत होतो.
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या बसेसना ‘रातराणी’ म्हणतात. त्या शांत बसस्थानकात अचानक हॉर्न वाजवून एन्ट्री मारतात, काही मिनिटे थांबतात आणि पुन्हा अंधार चिरत पुढच्या गंतव्याच्या दिशेने निघून जातात. त्या रातराणी बसचा येण्या-जाण्याचा नाद वेगळाच असतो. काही बसेस दिवसा तासन् तास प्रवास करून आल्यामुळे त्यांच्या पुढच्या काचांवर धूळ असते, काही बसस्थानकाच्या एका कुठल्यातरी कोपऱ्यात लपून बसतात.
बसस्थानकावर उभा असताना समोरून आलेल्या एका बसकडे पाहिले आणि विचार केला—"ही बस खूप लांबून आली..."काही सीट्स रिकाम्या आणि एवढ्या लांबून प्रवास करून दमलेली ती बस माझ्यासारख्या कोणीतरी दुसऱ्या प्रवाशाची वाट पाहत होती. कोण जाणे, कुणाच्यातरी गावची ही बस असेल, जिच्यासाठी कोणीतरी तासन् तास वाट पाहत असेल, जशी मी माझ्या बसची वाट पाहत होतो.
पहाटेचे ४:१० वाजलेले, फलाटावर उभा असताना एक अशी बस आली जिच्या फलकावर माझ्या गावाचे नाव झळकत होते. ती नाशिक-जालना-कळमनुरी (कळमनुरी आगार, परभणी विभागाची) बस होती, त्या क्षणी झालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही. दूर कुठेतरी कोणीतरी म्हणत होतं—"ही आपली गावची बस आहे!" त्या वेळी एक वेगळीच मजा फिलिंग येते, तेव्हा कळतं की प्रवास करणं हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नाही, तर तो आपल्याला आपल्या ओळखीच्या जागांशी जोडतो.
अखेर, ५:३० वाजता मनाला शांती मिळाली, चार तास वाट पाहिल्यानंतर ती बस आली ! ती नवीन बस नाशिक-वाशिम मार्गावर पहिल्यांदा धावणार होती. तिच्या समोर उभा राहून मी तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहत होतो—तिच्या पांढऱ्या पट्टया आणि लाल रंग, चमकणारे हेडलाइट्स, प्रवाशांनी घेतलेली पहिली तिकीटं. मी आणि त्या बसने एक नवीन प्रवास सुरू केला, आणि त्या प्रवासाच्या पहिल्या क्षणांचा मी साक्षीदार झालो.
त्या बसने मला सकाळी ८:१५ वाजता छ. संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकला सुखरूप पोहोचवलं. त्या बससोबत प्रवास केलेला क्षण विसरू नये आणि नेहमी लक्षात राहावा म्हणून हा लिहिला.
हे चार तास फक्त एक बसची वाट पाहिलेला काळ नव्हता—हा एक अनुभव होता. रात्रीचे बसस्थानक, थंडीत प्यायलेला चहा, रात्री चालणाऱ्या बसेसची गजबज, स्वतःच्या गावाची बस दिसल्याचा आनंद, आणि अखेर नवीन बसच्या आगमनाचा क्षण—हे सगळेच आठवणीत राहणारे क्षण होते.
बसस्थानक म्हणजे केवळ प्रवाशांची चढ-उतार होणारी जागा नाही, तर ती प्रत्येक प्रवाशाच्या भावनांना स्पर्श करणारी एक अनोखी जागा आहे—जी वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेली असते!

Comments