दुसऱ्या शहरातून जात असताना अचानक आपल्या गावाकडची एसटी बस दिसली की, जी भावना उमटते, ती शब्दांत मांडणं कठीण आहे.

दुसऱ्या शहरातून जात असताना अचानक आपल्या गावाकडची एसटी बस दिसली की, जी भावना उमटते, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. त्यावेळी मन नकळतच भूतकाळात जातं आणि त्या बससोबत प्रवास केलेल्या आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागतात.


असाच एक प्रसंग घडला छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)मध्ये. संध्याकाळची वेळ होती, मध्यवर्ती बसस्थानकात गेलो, मला नागपूरला जायचं होतं. पुणे-नागपूर शिवशाही बस शोधता अचानक माझी नजर समोर पार्किंगमध्ये उभी असलेली,"पालघर-छ. संभाजीनगर" ही बस दिसली. यंदा बस लवकरच आली होती. तिला पाहून पहिल्याच नजरेत मन भरून आलं. ज्या बसने आपलं गाव जोडलं आहे, ज्या बसने नेहमी वाडा ते संभाजीनगर आणि संभाजीनगर ते वाडा येणं-जाणं सुरू राहतं, जी आपल्यासोबत कित्येक प्रवासाच्या आठवणी घेऊन फिरते, ती बस अचानक त्या शहरात दिसावी आणि आपण तिला ओळखावं, या क्षणाची बातच काही औरच आहे.

ही बस संध्याकाळी वाडयात ४-४:३० च्या आसपास येते, सर्वात मोठा आनंद तेव्हा होतो, जेव्हा त्याच क्रमांकाची बस पुन्हा आपल्या गावात दिसते. ज्या शहरात तिला पाहून थोडं हळहळ वाटली होती, तीच बस आपल्या गावात परत येते आणि मग आपण मोठ्या उत्साहाने तिच्याकडे बघतो. आपल्या गावच्या मोकळ्या रस्त्यावर ती धावताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. 


बस दिसली की नकळत तिच्या मागोमाग नजर फिरते—चालक कोण आहे? वाहक कोण आहे ? कुठल्या डेपोची आहे ? बस साधी लालपरी आहे की एमएस बॉडी आहे ? बसचा नंबर कोणता आहे ? या सगळ्या गोष्टी मी शोधू लागतो. ही बस माझ्या गावाच्या आठवणी ताज्या करते. काही वेळ थांबून तिला बघावंसं वाटतं, तिच्या सोबत सेल्फी काढावीशी वाटते, तिच्या आजूबाजूला जाऊन पाहावंसं वाटतं.

तिच्या सोबत प्रवास करताना जर ती बस हॉटेलवर थांबली, तर चालक आणि वाहक यांना भेटायचं आकर्षण वेगळंच असतं. त्यांच्याशी दोन शब्द बोलताना, त्यांच्या अनुभवांना ऐकताना, आपणही नकळत एसटीच्या प्रवासाचा एक भाग झाल्यासारखं वाटतं. कधी कधी तर प्रवासात सोबत असलेले चालक-वाहक पुन्हा कधीतरी भेटतात आणि मग गप्पांचा ओघ काही थांबत नाही.


एसटी ही फक्त एक प्रवासी वाहन नाही, ती आठवणींची पेटी आहे. आपण तिच्यात कधी एकटे प्रवास केलेला असतो, तर कधी मित्रांसोबत, कधी कुटुंबासोबत. कधी रात्रीचा प्रवास, कधी गड-किल्ल्यांच्या दिशेने प्रवास, तर कधी गावाहून शहराकडे प्रवास. प्रत्येक प्रवासात तिच्यासोबत एक नवा अनुभव जोडलेला आहे.

कधीतरी त्या बसमधून एखाद्या आनंदाच्या क्षणात प्रवास केलेला, तर कधीतरी एखाद्या दु:खद घटनेच्या वेळी प्रवास झालेला असतो. पण त्या बसने आपल्याला आपल्या गावी सुखरूप पोहोचवलं आहे, म्हणूनच ती बस परक्या शहरात दिसली तरी आपुलकीची वाटते.


ही बस संध्याकाळी वाडयात ४-४:३० च्या आसपास येते, सर्वात मोठा आनंद तेव्हा होतो, जेव्हा त्याच क्रमांकाची बस पुन्हा आपल्या गावात दिसते. ज्या शहरात तिला पाहून थोडं हळहळ वाटली होती, तीच बस आपल्या गावात परत येते आणि मग आपण मोठ्या उत्साहाने तिच्याकडे बघतो. आपल्या गावच्या मोकळ्या रस्त्यावर ती धावताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. 


कधीकधी आपण तिला परक्या शहरात पाहतो, पण पुढचा प्रवास आपल्याला करावाच लागतो. ती दिसली तरी तिच्याजवळ जास्त वेळ राहता येत नाही. पण मनात विचार येतो—"घरी गेल्यावर पुन्हा भेट होईलच!" आणि जेव्हा ती पुन्हा आपल्या गावात दिसते, तेव्हा वाटतं, "परवा तर तिथे  दिसली होती, आज इथे आहे !"


एसटी फक्त बस नाही, ती गावाशी जोडणारा धागा आहे. ती परक्या शहरात दिसली की आपण हरखून जातो, आठवणींमध्ये रमतो, आणि तिच्याशी एक अनोखी नाळ जोडली जाते. मग ती गावात परत आली की, आपल्यालाही घरी परत आल्यासारखं वाटतं!


 इतर ब्लॉग:- 

▪️नाशिक-जालना-वाशिम :- https://buskaaashik.blogspot.com/2025/03/blog-post_19.html

▪️लग्न वऱ्हाडीच्या बसचे मनोगत :- https://buskaaashik.blogspot.com/2025/03/blog-post_12.html

▪️ एसटीच्या प्रवासातील अनपेक्षित अनुभव :-  https://buskaaashik.blogspot.com/2025/02/blog-post_10.html

▪️लालपरीचे मनोगत- https://buskaaashik.blogspot.com/2023/10/blog-post.html 


Comments