ऑफिसची शिवनेरी ट्रिप: इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा संगम

 

रविवारची पहाट, घड्याळात ५:२० वाजले होते. आम्ही ऑफिसच्या सहकाऱ्यांसह शिवनेरी गडाच्या साहसी प्रवासाला निघालो होतो. सोलनकर ट्रॅव्हल्सची बस आमची साथी होती, आणि चालक नवीन असल्यामुळे शहापूर पर्यंत मी त्यांना मार्गदर्शन केले.


पहाटे ५:२० वाजता आमचा प्रवास शिरीषपाडा-अबिटघर मार्गे शहापूरकडे सुरू झाला. 

शहापूरहून आम्ही मुरबाड तालुक्यातील सरळगावकडे निघालो, जो कल्याण-अहमदनगर महामार्गावर वसलेला आहे. तेथे हॉटेल 'समाधान'वर आम्ही थांबलो, आमच्या ऑफिसच्या मुख्याधिकारी सरांची भेट झाली. चहा-पाण्याचा आस्वाद घेतला आणि पुढील प्रवासासाठी ताजेतवाने झालो.


पुढे आम्ही माळशेज घाटात थांबलो, जो आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट पावसाळ्यात धबधबे, दऱ्या आणि हिरवाईने नटलेला आहे,नेहमीसारखा मी बसचे फोटो किंवा विडिओ जे होईल ते घेण्याच्या तयारीत होतो. तेथील निर्सगाला कॅमेऱ्यात कैद करून पुढचा प्रवास सुरु केला. 

माळशेज घाट पार करून आम्ही जुन्नर शहरात पोहोचलो. जुन्नर, पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर, जे शिवनेरी किल्ल्याच्या जवळ आहे. तेथे हॉटेलवर आम्ही नाश्ता केला आणि गड चढण्याची तयारी केली.


साधारण ११:४० वाजता आम्ही शिवनेरी गड चढण्यास सुरुवात केली. शिवनेरी किल्ला,जो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखला जातो. गड चढताना आम्ही त्याच्या विविध दरवाजांमधून गेलो, ज्यांपैकी 'महादरवाजा' विशेष उल्लेखनीय आहे. आमच्या सोबत गडाची माहिती देणारा गाईड म्हणजेच मार्गदर्शक पण होता, त्यांनी आम्हाला गडाविषयी खूप सारी माहिती सांगितली. गडाच्या आत, शिवाई देवीचे मंदिर, जामा मस्जिद आणि बदामी तलाव यांसारख्या वास्तू आहेत.


दुपारी ३:४५ वाजता गड उतरल्यानंतर, आम्ही जुन्नरपासून काही अंतरावर असलेल्या 'हॉटेल आमंत्रण' येथे पोहोचलो. तेथे बाजरीची भाकरी आणि चिकनचे रुचकर जेवण केले.


जेवणानंतर, आम्ही ओझर येथे विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. ओझरचे विघ्नेश्वर मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे आणि त्याची हेमाडपंथी बांधणी विशेष आकर्षक आहे.दर्शन घेऊन बस पार्किंगजवळ असलेल्या तलावाजवळ थोडा वेळ घालवला.


संध्याकाळी ६:२० वाजता ओझरहून निघालो. माळशेज घाट ओलांडून सरळगाव येथे पोहोचलो आणि त्याच हॉटेल 'समाधान'वर रात्रीचे जेवण केले. परतीच्या प्रवासात आम्ही वासिंद मार्गे आलो, ज्यामुळे वेळेची बचत झाली. सकाळी वाडा-शहापूर मार्गे सरळगाव जाताना ५ तास लागले होते, तर वासिंद मार्गे फक्त ३ तासच लागले. तसा रस्ताही चांगला होता.


रात्री १२:०४ वाजता आम्ही वाड्याला सुखरूप पोहोचलो. हा प्रवास माझ्यासाठी आठवणींनी भरलेला आणि आनंददायी ठरला.

शिवनेरी गड आणि त्याच्या आसपासच्या परिसराचा प्रवास करताना, स्थानिक इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा अनुभव घेतला. 


अशा प्रकारे, आमची 'शिवनेरी ट्रिप' संस्मरणीय ठरली, ज्यात इतिहास, निसर्ग आणि सहकाऱ्यांचा सहवास यांचा सुंदर मिलाफ झाला.


▪️आमचे इतर ब्लॉग्ज वाचा▪️

▪️एसटीची कधीही न थांबणारी दोन चाके- https://buskaaashik.blogspot.com/2022/12/blog-post.html

▪️ठाणे जिल्ह्यातील वाडा बसस्थानकाचे वेळापत्रक पहा- https://buskaaashik.blogspot.com/2024/05/work-in-progress.html

▪️बोईसर आगारचे वेळापत्रक पहा- https://buskaaashik.blogspot.com/2024/06/blog-post_11.html

▪️ लोकं म्हणतात....- https://buskaaashik.blogspot.com/2024/04/blog-post.html

▪️लालपरीचे मनोगत- https://buskaaashik.blogspot.com/2023/10/blog-post.html 

▪️ मनात रुतलेली लालपरी- https://buskaaashik.blogspot.com/2022/12/blog-post_20.html

▪️लालपरीचे मनोगत- https://buskaaashik.blogspot.com/2023/10/blog-post.html

▪️ वाडा ते नाशिक पावसाळी प्रवास- https://buskaaashik.blogspot.com/2024/06/blog-post_24.html

Comments